इगतपुरी तालुक्यातील पारदेवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

शाळेच्या जीर्ण इमारतीला मोठ्या भेगा पडल्या असून, पावसाळ्यात छत गळत असल्याचा आरोप आहे. तसेच स्वच्छतागृहाची दुरवस्था आणि गेल्या दहा दिवसांपासून खंडित वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शाळेतील विद्यार्थीही आंदोलनस्थळी सहभागी झाले. हातात तिरंगा आणि विविध मागण्यांचे फलक घेत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

शाळेची इमारत तातडीने दुरुस्त करावी, वीजपुरवठा सुरळीत करावा आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था सुधारावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *