गडचिरोलीतील धानोरा येथील आश्रमशाळेत तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 शासकीय आश्रमशाळा, 1 एकलव्य आश्रमशाळा आणि 23 अनुदानित आश्रमशाळा आहेत. धानोरा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन उघड्या विहिरी, तलाव, पाण्याचे साठे, पडलेले लाकूड, लोखंडी सळ्या, वाढलेले गवत आणि मैदानात साचलेले पाणी यासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बाबींची तपासणी केली. त्रुटी आढळलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमधील खिडक्यांना जाळ्या बसविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे.
सर्व आश्रमशाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असून सध्या कोणतीही मोठी अडचण नसल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
