बुलढाणा जिल्ह्यात कामाच्या प्रचंड तणावामुळे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप हाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. NQAS मूल्यांकनाची तयारी, साधनांचा अभाव आणि वरिष्ठांच्या ताणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे.
मेहकर तालुक्यातील मांडवा उपकेंद्रात कार्यरत 37 वर्षीय डॉ. संदीप प्रकाशराव हाडे यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण केले. त्यानंतर काही तासांतच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
चार-पाच दिवसांत NQAS समितीच्या मूल्यांकनाची तयारी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्रीचा अभाव असताना वरिष्ठांकडून मोठा ताण असल्याचा आरोप समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे. आत्महत्येच्या दिवशी सकाळीच त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे राजीनामाही दिल्याची माहिती आहे.
कौटुंबिक किंवा आर्थिक अडचण नसताना कामाच्या आणि प्रशासकीय जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संघटनेचा दावा आहे. या प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील निष्पक्ष समितीकडून चौकशी करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
