JALGAON | जळगाव जिल्ह्यातील ग्रामसभांसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांऐवजी इतर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जळगाव जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या राज्य कार्यकारिणीच्या निर्देशानुसार १८ ऑगस्ट २०२६ पासून अनिश्चित कालावधीसाठी ग्रामसभांमध्ये सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी कामकाज करणार नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सचिव पदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १६ ऑगस्ट २०२६ पासून आयोजित ग्रामसभांसाठी अन्य विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि ग्रामसभांचे कामकाज सुरळीत राहावे, यासाठी तातडीने योग्य सूचना निर्गमित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
फिरोज तडवी | एनटीव्ही न्यूज मराठी | यावल
#Jalgaon #Yaval #GramSabha #GramPanchayat #GramSevak #MaharashtraNews #JalgaonNews #BreakingNews #MarathiNews #NTVNewsMarathi #MaharashtraBreaking #LatestNews
