आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वादविवाद होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. तीन दिवसांत ८३ वाहनांवर कारवाई करत ७५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्यात आगामी काळात दहीहंडी, ईद-उल-मिलाद-उन-नबी आणि गणेशोत्सव सण येत आहेत. या काळात कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांमध्ये वाहतुकीची शिस्त निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथे विशेष मोहीम राबवण्यात आली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सैय्यद मोइनोद्दीन, पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, वाहतूक शाखेचे अर्शद तडवी आणि पोलीस कर्मचारी दिवाकर जोशी यांनी ही कारवाई केली.
विना हेल्मेट वाहन चालविणे, अल्पवयीन चालक, ट्रिपल सीट आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातून ७५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
