यावल आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच नवीन अत्याधुनिक बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील उपस्थित असतानाही त्यांना व्यासपीठावर योग्य सन्मानाचे स्थान न देता बाजूच्या खुर्चीवर बसावे लागल्याचा आरोप आहे. दीपप्रज्वलनाच्या वेळी त्यांचे नाव उशिराने घेण्यात आले, तसेच सत्काराच्या वेळीही आवश्यक प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याचे अतुल पाटील यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्ष या कार्यक्रमातील प्रमुख लोकप्रतिनिधींपैकी एक असतानाही अपेक्षित सन्मान न मिळाल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन आगार प्रशासनाची जबाबदारी असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी माईक हातात घेऊन सूत्रसंचालनात हस्तक्षेप केल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला पडून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अतुल पाटील यांनी, लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सन्मान आणि शासकीय कार्यक्रमातील प्रोटोकॉल पाळला जात नसेल, तर हा संपूर्ण यावल शहराचा अपमान असल्याची भूमिका घेत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
“लोकप्रतिनिधींचा सन्मान हा पक्षीय राजकारणापेक्षा मोठा आहे. राजकारण करायचे असेल तर ते निवडणुकीच्या मैदानात करा; मात्र शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल आणि सन्मान पायदळी तुडवून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया अतुल पाटील यांनी व्यक्त केली.
