यावल तालुक्यातील सावखेडा सिम शिवारातील निमळाव जंगलात रानटी डुकरांनी शेतात धुमाकूळ घातला आहे. २२ तारखेच्या रात्री रानडुकरांनी केळी आणि मका पिके उपटून फेकून दिल्याने शेतकऱ्यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सावखेडा सिम येथील नथू बंडू पाटील यांच्या शेतातील पाच हजार केळी लागवडीपैकी सुमारे एक हजार केळीची खोडे रानडुकरांनी उपटून फेकून दिली. यात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तर प्रकाश सुभाष पाटील यांच्या दोन एकर मका क्षेत्रापैकी दीड एकर क्षेत्रातील मका पिकाचे नुकसान झाले असून, त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वन्य प्राणी गावाकडे वळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच महागडे बियाणे, खते आणि मजुरीमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यातच निसर्गाचा कोप आणि वन्य प्राण्यांचा त्रास असह्य झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
वन विभागाने तातडीने दक्षता बाळगून रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सावखेडा सिमसह दहिगाव, नायगाव, मोहराळा, हरिपुरा आणि कोरपावली येथील शेतकरी करीत आहेत.
