यावल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले मिळवून देण्याच्या प्रक्रियेत कथित अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शब्बीर खान यांनी केली आहे.

याबाबत शब्बीर खान यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांना ई-मेलद्वारे निवेदन सादर केले आहे. जन्म-मृत्यू दाखला हा नागरिकांसाठी महत्त्वाचा शासकीय दस्तऐवज असून, विविध शासकीय योजना, शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांसाठी त्याची आवश्यकता भासते. त्यामुळे दाखले देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावल पंचायत समितीतील संबंधित यंत्रणेच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी. चौकशीत संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, तसेच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन जन्म-मृत्यू दाखले वेळेत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आपल्या मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही शब्बीर खान यांनी दिला आहे. आता या निवेदनावर यावल पंचायत समिती आणि प्रशासनाची पुढील भूमिका काय राहते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *