गोंदिया जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून रिपरिप पाऊस सुरू असून, जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. उलटी, हगवण आणि टायफॉईडसारख्या आजारांचे रुग्ण वाढत असून, ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पावसामुळे साचलेले पाणी आणि तुंबलेल्या गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे.
नागरिकांनी पाणी उकळून किंवा शुद्ध करून प्यावे, विहिरीचे पाणी थेट पिणे टाळावे, तसेच मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले यांनी केले आहे.
तसेच ग्रामपंचायतींनी साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, धूर फवारणी आणि फॉगिंग करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास पावसाळ्यातील आजारांपासून बचाव करता येईल.
