सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वारंवार तक्रारी करूनही रुग्णालय प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा दावा करण्यात येत आहे.
वेळीच त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असती तर डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांचा दुसरा बळी गेला नसता, अशी चर्चा फलटणसह महाराष्ट्रात सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि यंत्रणा रामभरोसे असल्याचा आरोपही केला जात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा शल्यचिकित्सक हे पद रिक्त असल्याने डॉक्टर आणि नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक लीला मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई करण्यास दिरंगाई झाल्यामुळे डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांचा बळी गेला, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाकडे आरोग्यमंत्र्यांनी लक्ष देऊन आरोग्य व्यवस्थेतील परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
