अहिल्यानगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे. किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला असून, यामुळे संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित विकासकामांना गती मिळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि स्टेशन कमांडर पी. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील लष्कराच्या मुख्यालयात हा करार करण्यात आला. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याच्या विकासाची घोषणा केली होती. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनीही यासाठी विशेष पुढाकार घेतला.

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेअंतर्गत या प्रकल्पाला १७ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली होती. मात्र किल्ला लष्कराच्या अखत्यारीत असल्याने अंतिम परवानगी आवश्यक होती. आता सामंजस्य करार झाल्याने महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

प्रकल्पात भव्य प्रवेशद्वार, वाहनतळ, स्वच्छतागृह, ऐतिहासिक तटबंदीचे संवर्धन आणि इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. बुरुज क्रमांक १ ते ११ पर्यंत सुमारे १३७० मीटर लांबीचा नेचर वॉकवे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुक्त नाट्यगृह आणि सोलर स्ट्रीट लाईटिंगही प्रस्तावित आहे.

ऐतिहासिक वारसा जपत पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये भारतीय पुरातत्त्व विभाग, वन विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आवश्यक मान्यतांचाही समावेश आहे.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *