श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तसेच गडाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने धर्मवीर गड, पेडगाव येथील कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे गडाच्या संवर्धनाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे.
डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संवर्धन, जतन आणि विकासासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला.
१२ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार जिल्हा नियोजन समिती, नाशिक अंतर्गत प्राचीन स्मारकांच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी उपलब्ध निधीतून धर्मवीर गडाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.
धर्मवीर गडाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी अतूट संबंध आहे. संगमेश्वर येथे पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पेडगावच्या या गडावर आणण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाच्या स्मृतींशी जोडलेल्या या ऐतिहासिक भूमीचे जतन महत्त्वाचे मानले जात आहे.
५ कोटींच्या निधीतून गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन-दुरुस्ती आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या स्मारकाच्या उभारणीला दिशा मिळणार आहे. गडाच्या विकासासाठी मोठ्या आराखड्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू असून, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या गडाला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
