कुकडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या डिंबे–माणिकडोह बोगद्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या सुधारित खर्चालाही मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिंबे धरणातील अतिरिक्त पाणी सुमारे १६ किलोमीटरच्या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात वळविण्याची योजना आहे. माणिकडोह धरणाची क्षमता सुमारे १०.५ टीएमसी असून, स्थानिक पावसामुळे ते अपेक्षित प्रमाणात भरत नाही. त्यामुळे पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा प्रभावी वापर करता येणार आहे.

या प्रकल्पाचा लाभ कुकडी डावा कालवा आणि लाभक्षेत्रातील जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच करमाळा तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला नियमित पाण्याचा आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करत दक्षिण अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *