रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यंदा रावेर आणि यावल तालुक्यासह परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आणि अनियमित राहिल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्याने केळी, कापूस, मका, सोयाबीन यांसह विविध पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी उभी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत.
अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. तसेच भूजल पातळी खालावत असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी उपलब्ध तांत्रिक पर्यायांचा विचार करणे गरजेचे असल्याचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी म्हटले आहे. रावेर-यावल मतदारसंघासह लगतच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या अर्थात ‘क्लाऊड सीडिंग’च्या शक्यतेचा तातडीने अभ्यास करून आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही आमदार जावळे यांनी व्यक्त केली आहे.
