उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत कावड यात्रेकरूंच्या अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या क्रुझर चालकाला नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने पाठलाग करून ही कारवाई केली.

६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उमरखेड येथील कावड यात्रेकरू नागपूर ते तुळजापूर महामार्ग क्रमांक ३६१ वरून पायी कावड यात्रा घेऊन जात होते. त्यावेळी एमएच २६ ए.के. ७३६७ क्रमांकाच्या क्रुझर चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत फिर्यादी अनुराग गजानन कदम, वय १८ वर्षे, रा. टिळक वॉर्ड, उमरखेड यांच्या ऑटोला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात कावड यात्रेकरू विशाल दीपक पवार, वय ३० वर्षे, रा. उमरखेड यांचा मृत्यू झाला, तर इतर १० ते १२ यात्रेकरू गंभीर व किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८५३/२०२६, कलम १०६(१) व इतर बीएनएस कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेत त्याचा पाठलाग करून लोहा, जिल्हा नांदेड येथून क्रुझर चालक परीमोहम्मद चाँद शेख, वय ४३ वर्षे, रा. शिवनी जामगा, ता. लोहा, जि. नांदेड याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला योग्य त्या अहवालासह न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड गुरव कायंदेपाटील आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *