उमरखेडमध्ये तब्बल ३० वर्षांपासून फरार असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला उमरखेड डीबी पथकाने जेरबंद केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले.
यवतमाळ जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने आणि उमरखेड पोलीस ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने शोधमोहीम सुरू केली होती.
उमरखेड शहरात १० मे १९९५ रोजी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास महेश शशिकांत डांगे यांच्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून त्यांना व घरातील इतर लोकांना मारहाण केली होती. त्यानंतर सोन्या-चांदीचे दागिने, त्यावेळच्या किंमतीनुसार १४ हजार ६५० रुपयांचे, जबरी चोरी करून नेण्यात आले होते. याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८/१९९५, कलम ३९२, ४५७, ३८० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्यातील आरोपी परेश रामा काळे, रा. कोळी, ता. हदगाव, जि. नांदेड हा गुन्हा केल्यापासून फरार होता. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले असून, सीआरपीसी ८२ प्रमाणे त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला असता तो उमरखेड येथे आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर सापळा कारवाई करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि योग्य त्या रिपोर्टसह न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड गुरव कायंदेपाटील आणि ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार विजय पतंगे, पोलीस हवालदार प्रसनजित भवरे, पोलीस हवालदार अतुल तागडे, पोलीस शिपाई दिगांबर गिते, संघशील टेंबरे, विष्णू राठोड, निवृत्ती महाळनर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
