• किनगावमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
  • विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या विविध भूमिका
  • गायत्री तायडे बनल्या विद्यार्थी मुख्याध्यापक
  • यश महाजन झाले उपमुख्याध्यापक
  • विद्यार्थी शिक्षकांनी घेतले वर्ग
  • आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा गौरव

यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्य आणि शैक्षणिक विचारांना उजाळा देत शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भाषणे केली.

मुख्याध्यापक आर. बी. सोनवणे यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उदय बडगुजर यांनी केले.
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व मुलाखत घेऊन मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांची निवड करण्यात आली. इयत्ता दहावीची कु. गायत्री तायडे यांनी मुख्याध्यापक, तर यश महाजन यांनी उपमुख्याध्यापक म्हणून शाळेचे कामकाज सांभाळले. विविध विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून वर्गांमध्ये अध्यापन केले. शिक्षकाची भूमिका प्रत्यक्ष अनुभवताना विद्यार्थ्यांना जबाबदारी, शिस्त, संयम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करावे लागणाऱ्या प्रयत्नांची जाणीव झाली.

यावेळी शाळेतील शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक आर. बी. सोनवणे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. आभार राजू गवळी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *