यावल पश्चिम वन विभागाने आडजात जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले आहे. या कारवाईत वाहन आणि जळाऊ लाकडासह तब्बल 3 लाख 60 हजार 8 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यावल पश्चिम वनक्षेत्रपाल प्रशांत जोशी यांच्या कार्यक्षेत्रातील हरिपुरा-जामण्या राऊंड स्टॉप पथकाने 7 सप्टेंबर 2026 रोजी गुप्त बातमीवरून ही कारवाई केली. हरिपुरा आणि जामण्या येथील राऊंड स्टाफ वड्री धरण ते वड्री रस्त्यावर गस्त घालत असताना संशयित पिकअप वाहन आढळून आले. वाहन चौकशीसाठी थांबवले असता चालक वाहन सोडून पसार झाला.
वन विभागाने वाहन क्रमांक महिला 19, S-4696 आणि त्यातील आडजात जळाऊ लाकूड, घनमीटर 06 असा एकूण 3 लाख 60 हजार 8 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमाल मु.वि. केंद्र यावल येथे पावतीने जमा केला. या वनगुन्ह्याप्रकरणी व.र. हरिपुरा पूर्व यांनी प्र.री.क्र. 5/2026, दिनांक 7 सप्टेंबर 2026 जारी केला असून पुढील तपास वनपाल हरिपुरा एस.बी. इंडे करीत आहेत.
ही कारवाई सौरिष सहाय, उपवनसंरक्षक यावल वनविभाग, जळगाव, एस.ए. पाटील, सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रा.व कॅम्पा आणि वनक्षेत्रपाल पी.डी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.ए. परदेशी, वनपाल जामण्या, एस.एस. भोंगरे, एस.पी. भालेराव, एस.बी. पाटणे, दीपक चव्हाण, राजेश बारेला, राजू तडवी आणि शकील तडवी यांनी केली.
दरम्यान, पश्चिम वनक्षेत्रात कारवाई होत असताना पूर्व वनक्षेत्रात कार्यालयापासून काही अंतरावरूनच अवैध लाकडाची वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व वनक्षेत्रातील वन विभागाच्या तपासणीवर आणि कारवायांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
