• डॉक्टरांच्या राजीनाम्याने राजकीय आरोप सुरू
  • जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता कायम
  • अधिकाऱ्यांना दमदाटीचा मनसेचा आरोप
  • कुणाल किनळेकरांचा केसरकरांवर निशाणा
  • राजकीय दहशतीचा मनसेकडून आरोप
  • केसरकरांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

SINDHUDURG | सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता असतानाच जिल्हा शल्य चिकित्सकांसह काही डॉक्टरांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईवरून मनसेने आमदार दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दमदाटी आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.
शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकाम हटविणे नियमानुसार योग्य असले, तरी राजकीय द्वेषातून अधिकाऱ्यांवर दबाव आणणे किंवा त्यांना दमदाटी करणे योग्य नाही, असे किनळेकर यांनी म्हटले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉक्टरांच्या राजीनाम्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या पक्षातील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्तेच जबाबदार असतील, तर याला राजकीय दहशतवादच म्हणावा लागेल, असा आरोप त्यांनी केला.
राजकीय दहशतीविरोधात नेहमी आवाज उठविणारे आमदार दीपक केसरकर या प्रकरणात मात्र मौन का बाळगत आहेत? त्यांनी ‘धृतराष्ट्राच्या भूमिकेतून’ बाहेर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *