- किनगाव बुद्रुकमध्ये कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग उपोषण
- २४ ते ४० महिन्यांपासून वेतन थकीत
- वारंवार अर्ज करूनही प्रशासनाची दखल नाही
- किमान वेतन कायद्यानुसार पगाराची मागणी
- पगार मागितल्यास नोकरीची धमकी
- सात वर्षांपासून बिन नोटीस काम
JALGAON | यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचारी थकीत पगार मिळत नसल्याने आज, १५ सप्टेंबरपासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या यावल शाखेने वारंवार लेखी अर्ज करूनही दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे.
सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, लिपिक, पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कामगार आणि ग्रामशिपाई २०१९ पासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे अर्ज देत आहेत. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. किमान वेतन कायद्यानुसार आणि नमुना क्रमांक २१ नुसार पगार मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत पगार जमा होतो, मात्र शिपाई, लिपिक, पाणीपुरवठा आणि सफाई कामगारांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २४ ते ४० महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.
३१ डिसेंबर २०२५ रोजी कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर ग्रामपंचायतीने कार्यवाही करावी, असे लेखी देण्यात आले. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पगार मागितल्यास “नोकरीवरून काढून टाकू” अशी धमकी दिली जाते, तसेच सात वर्षांपासून बिन नोटीस काम करत असल्याचा आरोप आहे.
पाणीपट्टी वसुलीसह इतर कामे करूनही हक्काचा पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणासाठी छगन साळुंखे, सेवानिवृत्त प्रदीप जोशी, जगदीश खंडारे, शांताबाई खंडारे, संदीप पाटील, सुरेश साळुंखे, संदीप राजू पाटील, निलेश घोडे, राजू जावा, गौतम कंडारे, भिकारल, राकेश कडारे, ज्योती जावा, रंजीता रल आणि वेणाबाई कडारे यांच्या सह्या असून ते उपोषणासाठी बसले आहेत.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव
