जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोसगाव येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी माकड अंगावर कुदल्याने कौशल्याबाई साहेबराव पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने गावात मोठी शोककळा व संताप व्यक्त होत होता.
घटनेची गंभीर दखल घेत पत्रकार अरुण पाटील, अरुण साहेबराव पाटील व सुनील केसर सिंग पाटील यांनी वनविभागाच्या रेंजर स्वप्निल फटांगरे यांची भेट घेऊन गावकऱ्यांच्या त्रासाची सविस्तर माहिती दिली होती. कोसगाव येथे २५ ते ३० माकडांचा उपद्रव असून त्यांना पकडून सातपुडा पर्वतात सोडावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार फैजपूर वनविभागाच्या डेपोकडून काल वनपाल ज्योती धनगर व राऊंड स्टॉपने गावात पिंजरा लावला होता. आज पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात ठेवलेल्या केळ्यांच्या आहारी जात त्रासदायक माकड अखेर जेरबंद झाले. माकड पकडल्याची माहिती समजताच परिसर व गावातील नागरिकांनी ते पाहण्यासाठी मोठी गर्दी केली असून, वनविभाqगाचे अधिकारी या माकडाला तेथून कधी नेतात याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
