जळगाव-यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद पीएमसी शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहावी या उद्देशाने ‘भुलाबाई’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
‘निपुण भारत’ अंतर्गत शंभर टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव येथे भुलाबाई बसविण्यात आली. यादरम्यान पार्वतीचे रूप बनवून विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले, तसेच शब्दपट्ट्या लावून भुलाबाईचे आकर्षक डेकोरेशन व सजावट करण्यात आली. सोहळ्यात सोनाली साळुंखे यांच्या हस्ते लहान मुला-मुलींना राजगिरा लाडू प्रसाद म्हणून वाटण्यात आला. रामेश्वरी बडगुजर, सोनाली साळुंखे, सोनाली चौधरी व विमल बारीला यांनी विशेष मेहनत घेऊन मुलींचा उत्साह वाढवला. प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील, पंकज पाटील, किशोर शिसोदे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करत शिक्षकांसोबत कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
