बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. साबलखेड येथील अवघ्या १३ वर्षीय सफा शेरअली शेख हिने रायफल शूटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. नागपूर येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिल्हा आणि विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपल्या नेमबाजी कौशल्याची छाप पाडणाऱ्या सफाची निवड जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अजिंठा रायफल शूटिंग क्लब, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर झाली आहे.

सफा शेख ही कडा येथील महावीर मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करण्याचे ध्येय तिने ठेवले आहे.

टीम टॉपर रायफल शूटिंग क्लबचे प्रशिक्षक अहमद पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. अचूकता, एकाग्रता, संयम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तिने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

येत्या २२ आणि २३ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा होणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सफाच्या या यशामुळे साबलखेड गावासह संपूर्ण आष्टी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, राज्यस्तरावर ती कशी कामगिरी करते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *