जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात दहिगाव परिसरात आज, ११ तारखेला एकूण १७ दुर्गोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात घटस्थापना करून दुर्गोत्सवाला प्रारंभ केला. कोरपावली आणि मोहराळा या गावांमध्ये ‘एक गाव, एक देवी’ हा उपक्रम राबवण्यात येत असून, इतर गावांमध्येही मोठ्या संख्येने घटस्थापना करण्यात आली आहे.

दहिगाव येथे नऊ दुर्गोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवला आहे. सावखेडा सी येथे तीन, महेलखेडी येथे दोन, विरवली येथे तीन, तर कोरपावली आणि मोहराळा येथे प्रत्येकी एका मंडळाने घटस्थापना केली आहे. अशा एकूण १७ दुर्गोत्सव मंडळांनी सहभाग घेतला आहे.

दहिगाव येथील कुलदैवत तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात चेतन बळीराम पाटील यांच्या हस्ते पूजन करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. १० तारखेच्या मध्यरात्रीपासूनच तरुण मंडळी देवीमातेच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने सज्ज झाली होती.

येत्या दहा दिवसांत मंदिरांसमोर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, दुर्गोत्सव मंडळांसमोर कोणत्याही प्रकारचे जुगार अड्डे चालवू नयेत, अशी ताकीदही पोलीस प्रशासनाने मंडळांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *