भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावासानिमित्त सुरू असलेल्या धम्म मालिकेअंतर्गत केज तालुक्यात विविध ठिकाणी कालवश सूर्यपुत्र यशवंत ऊर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन तसेच अनागरिक धम्मपाल आणि पेरियार स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा, बीड जिल्हा पूर्व अंतर्गत शहर शाखा केज यांच्या वतीने वर्षावासानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन व धम्म मालिकेचे आयोजन वेळूवन बुद्ध विहार, भीमनगर केज येथे करण्यात आले.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या वर्षावास काळात दररोज या ग्रंथाचे वाचन करण्यात येत असून, जिल्हा शाखेने दिलेल्या वेळापत्रकानुसार धम्म मालिकेतील वेगवेगळे विषय त्या त्या दिवशी घेतले जातात.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहराध्यक्ष जयपाल मस्के यांनी भूषवले असून, त्यांनीच प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी कोषाध्यक्ष चंद्रकांत मस्के, संघटक दिपक मस्के, ज्येष्ठ नागरिक साहेबराव मस्के यांच्यासह सुरेखा मस्के, कुसुम मस्के, रत्नमाला मस्के, आशाबाई मस्के, कलावती हजारे, कौशल्या मस्के, सुनीता हजारे, जनाबाई मस्के, मैनाबाई मस्के आदी पदाधिकारी व बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला ग्रंथाचे एक पान वाचण्यात आले. त्यानंतर जयपाल मस्के यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांची बौद्धाचार्याचे जनक म्हणून असलेली भूमिका, चैत्यभूमीच्या उभारणीतील कार्य, बाबासाहेबांच्या प्रिंटिंग प्रेसमधील योगदान तसेच महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळल्याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच अनागरिक धम्मपाल यांनी बोधगया महाबोधी मंदिराच्या मुक्तीसाठी दिलेला लढा व महाबोधी सोसायटीच्या स्थापनेबाबत, तर पेरियार स्वामी यांनी जातीव्यवस्था व अंधश्रद्धेविरुद्ध दिलेला लढा आणि स्वाभिमान चळवळीबाबत उपस्थितांना अवगत करण्यात आले.
दुसरीकडे, भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा केज यांच्या वतीने बौद्धवाडा होळ, ता. केज येथेही धम्म मालिकेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बालासाहेब जोगदंड होते.
प्रमुख प्रवचनकार म्हणून भारतीय बौद्ध महासभा, बीड जिल्हा पूर्वचे संस्कार उपाध्यक्ष एस. बी. मोरे यांनी मार्गदर्शन करताना भैय्यासाहेब आंबेडकर यांचे धम्मकार्यातील योगदान, अनागरिक धम्मपाल यांचे बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानातील कार्य आणि पेरियार स्वामी यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचारांवर सविस्तर प्रकाश टाकला.
याप्रसंगी कोषाध्यक्ष बळीराम सोनवणे, समता सैनिक दलाचे कंपनी कमांडर भारत ढालमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष जयपाल मस्के यांनी केले.
कार्यक्रमास विद्याताई कांबळे, सुशीला सरवदे, सुजाता कांबळे, मंदाकिनी सरवदे, चित्राताई कांबळे, सुलाआई सरवदे, कालिदास कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक व बालक-बालिकांची मोठी उपस्थिती लक्षणीय ठरली.
धम्म मालिकेतील या प्रबोधनात्मक कार्यक्रमांमुळे केज तालुक्यात उत्साहपूर्ण व धम्ममय वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी महामानवांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करत कार्यक्रमांची सांगता केली.
