जळगावच्या यावल तालुक्यातील कोरपावली-जामुनझिरा रस्त्यावर अवैध बांबू वाहतूक करणारी बुलेरो पिकअप वनविभागाने ताब्यात घेतली आहे. कारवाईदरम्यान वाहन चालक गाडी सोडून पसार झाला असून, बांबूंसह वाहन असा एकूण 3 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त खबरीनुसार, यावल वनविभागाचे राऊंड स्टाफ 18 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास जामुनझिरा-कोरपावली रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी अवैध वाहतूक करणारी बुलेरो पिकअप संशयितरीत्या आढळून आली. वाहनाची चौकशी केली असता चालक वाहन सोडून पसार झाला.
सदर वाहनाचा क्रमांक MH06/BG-1259 असून, त्यामध्ये 1 हजार 800 बांबू नग, किंमत 34 हजार रुपये, तसेच वाहनाची किंमत 3 लाख रुपये, असा एकूण 3 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमाल मुद्देमाल वाहन केंद्र, यावल येथे पावतीने जमा करण्यात आला.
या वनगुन्ह्याबाबत वनपरिक्षेत्र कार्यालय हरिपुरा यांनी प्र.री.क्र. 05/2026, दिनांक 18/09/2026 जारी केला आहे. पुढील तपास वनपाल हरिपुरा एस. बी. इंडे करीत आहेत.
ही कारवाई म. उपवनसंरक्षक एस. सहाय सर, यावल वन विभाग जळगाव; म. सहाय्यक वनसंरक्षक एस. ए. पाटील, यावल प्रादेशिक व कॅम्पा; तसेच पी. डी. जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये एस. बी. इंडे, वनपाल हरिपुरा; श्रीमती एस. पी. भालेराव, वनरक्षक हरिपुरा; श्रीमती एस. एस. भोंगरे, वनरक्षक हरिपुरा पूर्व; एस. बी. पाटणे, वनरक्षक; योगेश मुंडे, वनरक्षक; आणि चेतन शेलार, वनरक्षक सहभागी होते.
