उमरखेड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर संकट ओढवले असल्याचा दावा शेतकरी प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी केला आहे. उभी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यात तातडीने परिस्थितीचे सर्वेक्षण करून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत चंदन सुदाम जाधव यांच्यासह विरेंद्र गजेन्द्र राठोड, निरंजन विष्णू राठोड, अनिल प्रकाश राठोड, आशिष गणेश राठोड, गजानन अरविंद राठोड आणि अनिल भीवसिंह चव्हाण यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाअभावी पिकांची अवस्था चिंताजनक झाली असून विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतीसोबतच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ठोस आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच पीक विम्याची रक्कम आणि दुष्काळी मदत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाणीटंचाई तीव्र झाल्यास जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर सुरू करावेत. आवश्यक गावांमध्ये चारा छावण्या सुरू करून पशुधन वाचविण्यासाठी तातडीने नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत द्यावी, तसेच बँका आणि पतसंस्थांकडून होणाऱ्या सक्तीच्या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पिकांचे नुकसान आणि वाढते आर्थिक संकट यामुळे शेतकऱ्यांमध्ये मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागात समुपदेशन केंद्रे, विशेष मदत कक्ष आणि तातडीच्या आर्थिक सहाय्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

शासन आणि प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *