प्रक्षोभक तसेच दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करणारे भाषण केल्याच्या आरोपावरून उमरखेड शहर पोलिसांनी हर्ष उर्फ हर्षू ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक सय्यद अफसर सय्यद कासम यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
सिद्धेश्वर दहीहंडी महोत्सवाच्या वेळी छत्रपती संभाजीनगर येथील कथित वक्ते हर्ष उर्फ हर्षू ठाकूर यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम समाजावर बहिष्कार टाकण्याचे आणि आर्थिक व व्यावसायिक संबंध तोडण्याचे आवाहन केल्याचा आरोप आहे.
या वक्तव्यामुळे उमरखेड शहरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण होऊन दोन समाजांमध्ये जातीय तेढ व दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
पोलिसांनी लेखी तक्रारीच्या आधारे एफआयआर क्रमांक ८९५/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम १९६(१), २९९ व ३५३(२) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
यावेळी एमआयएमचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान ताऊ, माजी नगरसेवक मुजीब बागवान, एड. सय्यद इलियास, अब्दुस्समद प्रिन्स, सय्यद गाझी, अजीम शेख, जबूर शेख, अहमद पटेल, शेख इनायत, नाजिर आतिश, इमरान शेख, सय्यद सरफराज, शेख लाल, शागिरोद्दीन यांच्यासह एमआयएमचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
