यावल शहरासह तालुक्यात यंदा १९४ दुर्गोत्सव मंडळांनी घटस्थापनेची तयारी केली असून, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, शहरासह ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरातील ४५, तर ग्रामीण भागातील १४९ अशा एकूण १९४ दुर्गोत्सव मंडळांनी परवानगी घेतली आहे. १० ऑक्टोबरच्या रात्रीपासून गावागावांत आणि शहरात दुर्गा भवानी मातेच्या मूर्तींचे आगमन झाले. भाविकांनी मोठ्या उत्साहात मातेचे स्वागत केले.
तालुक्यातील दहिगाव, सावखेडा, सिम, कोरपावली आणि महेलखेडी येथील नवतरुण युवकांनी दुर्गोत्सवात मोठा सहभाग नोंदविला आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कुलदैवत तुळजापूरच्या भवानी माता मंदिरात चेतन बळीराम पाटील यांनी सपत्नीक घटस्थापना केली. यावेळी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या काळात बंदोबस्तासाठी जळगाव आणि भुसावळ येथून पोलीस व ट्रॅफिक पोलिसांची फौज मागविण्यात आली आहे. यासोबतच ८७ होमगार्ड, एक आरसीपी कॅम्प आणि एक सीआरएफ कॅम्प असा तगडा बंदोबस्त यावल पोलीस ठाण्यामार्फत मागविण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकांत बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
