दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या यावल शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी, नळपट्टी आणि इतर स्थानिक कर माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपाच्या गटनेत्या तथा नगरसेविका नंदाताई राजेंद्र महाजन या मागणीसाठी यावल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील यावल शहराची लोकसंख्या सुमारे ५८ हजार असून, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी शेतीचे नुकसान झाल्याने नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, स्थानिक करांचा अतिरिक्त भार कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षातील घरपट्टी, नळपट्टी आणि इतर लागू स्थानिक कर पूर्णतः माफ करण्यासाठी आवश्यक ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी नगरसेविका नंदाताई राजेंद्र महाजन करणार आहेत.
नागरिकांना आर्थिक दिलासा देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची सामाजिक जबाबदारी असल्याचे नमूद करत, नगरपालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
