जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड बिनविरोध झाली आहे. अर्जुन भागवत भदाणे यांची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
जवखेडे सिम येथे गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी विशेष बैठक घेण्यात आली. अर्जुन भागवत भदाणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच ठकुबाई रमेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसेवक प्रवीण अहिरे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित उपसरपंच अर्जुन भदाणे यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या हस्ते फेटा बांधून, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी पेढे वाटून आणि घोषणा देत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी माजी सरपंच दिनेश आमले, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
