नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात पाटोदा थडी आणि गुजरी फिडरवरील शेतीच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना एक दिवसाआड १६ तास वीजपुरवठा देण्याची मागणी करत पवनकुमार गंगाधर पाटील यांनी महावितरणला निवेदन दिले असून, मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी व गुजरी फिडरअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसा आणि नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याची तक्रार आहे. हा फिडर कुंडलवाडी सबस्टेशनअंतर्गत येतो. इतर गावांमध्ये दररोज आठ तास वीज मिळत असताना गुजरी फिडरवरील शेतकऱ्यांना एक दिवसाआड आठ तास वीज मिळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पवनकुमार गंगाधर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी महावितरणच्या धर्माबाद उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. शेतीसाठी एक दिवसाआड १६ तास वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मागणी तातडीने मान्य न झाल्यास २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता कुंडलवाडी येथे आत्मदहन करण्याचा इशारा पवनकुमार गंगाधर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार आणि कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
आता महावितरण प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हनुमंत चंदनकर | एनटीव्ही न्यूज मराठी | धर्माबाद, नांदेड
