हिंगणघाटच्या प्रज्वल हेमराज सहारेने ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे हिंगणघाटचा नावलौकिक वाढला असून, आता गुजरातमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
नागपूर येथील ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत हिंगणघाट येथील रा. सू. बिडकर महाविद्यालयाचा खेळाडू प्रज्वल हेमराज सहारे याने ज्युदोच्या ८३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले असून, गुजरात येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
या यशाबद्दल रा. सू. बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजूरकर आणि क्रीडाशिक्षक बलराज आवचट यांनी प्रज्वलचे अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रज्वलच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
