वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम पोलिसांनी विदेशी दारूच्या तस्करीविरोधात कारवाई केली आहे. दत्तपूर चौकात पवनारकडून वर्ध्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी करून मारुती सुझुकी ब्रेझा कारमधून विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत कारसह एकूण १० लाख ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.
दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सेवाग्राम पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस स्टेशन सेवाग्रामचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दत्तपूर चौकात पवनारकडून वर्ध्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी केली.
यावेळी मारुती सुझुकी ब्रेझा कार क्रमांक MH-32-AH-3417 मध्ये चालकाच्या सीटवर दिनेश अशोकराव येंडाळे, वय ३५ वर्षे, रा. नालवाडी, वर्धा हा आढळून आला. मध्य प्रदेशातून उपलब्ध झालेली विदेशी दारू नागपूर-पवनार मार्गे वर्ध्याकडे आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पंचांसमक्ष कारची तपासणी केली असता, २३ खाकी खोक्यांमध्ये ऑफिसर चॉईस विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १ हजार १०४ बाटल्या, किंमत २ लाख ७६ हजार रुपये, तसेच दोन खाकी खोक्यांमध्ये ऑफिसर चॉईस ब्लू विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ९६ बाटल्या, किंमत २८ हजार ८०० रुपये, असा दारूसाठा आढळला. याशिवाय ७ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी ब्रेझा कारही जप्त करण्यात आली. अशा प्रकारे कारसह एकूण १० लाख ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील मंडलिक यांच्या आदेशान्वये करण्यात आली. सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार येळणे, पोलीस हवालदार संदीप मेंढे (बक्कल क्रमांक ७३१), सहाय्यक फौजदार सतीष दरवरे (बक्कल क्रमांक ५८२) आणि पोलीस शिपाई अक्षय गुडापे (बक्कल क्रमांक ९३०) यांनी ही कारवाई केली.
