यावल तालुक्यातील दहिगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न यावल येथे झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. गावातील पाण्याची खालावलेली पातळी आणि आगामी पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

सातपुड्याच्या लगत असलेल्या दहिगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या चार ट्यूबवेलची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायतीच्या मालकीची शेतजमीन शासनाने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतली आहे. या क्षेत्रात दोन विहिरी असून, त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. या विहिरींमधून पाण्याची व्यवस्था करावी आणि वीज वितरण कंपनीने विजेचे खांब उभारून गावाला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गावाचे माजी उपसरपंच देविदास पाटील यांनी आमदार अमोल जावळे आणि आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्यासमोर मांडली.

तसेच, जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत आणि पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर राबवावी, अशी मागणीही करण्यात आली.

सातपुड्यालगतचा परिसर असल्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असून, दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच हंबर्डी गावातील पाणीप्रश्नाचाही बैठकीत मुद्दा उपस्थित झाला.

या सर्व प्रश्नांवर पुन्हा दहा ते अकरा दिवसांनंतर आढावा बैठक घेण्यात येईल आणि त्यामध्ये उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे पूर्ण केले जातील, असे आश्वासन दोन्ही आमदारांनी दिले.

या बैठकीला तहसीलदार मोहनमाला नाझरीकर, गटविकास अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *