जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात संशयातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी पतीला पोलिसांनी साकळी गावाजवळ ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

यावल शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आयेशा नगरमधील तिरुपती नगर परिसरात ही घटना घडली. शेख साबीर शेख आमिन यांच्या घर क्रमांक ५७० मध्ये आरिफ खान गनी खान हे भाड्याने राहतात. त्यांचा मोठा मुलगा फरदीन खान आरिफ खान (वय २१) याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. फरदीन आणि त्याची पत्नी मशीराबी फरदीन खान (वय २०) हे दोघे सोमवारी घरी होते. कुटुंबातील इतर सदस्य लग्नसमारंभासाठी गावात गेले होते.

दरम्यान, दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून फरदीनने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबून हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.

सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद, हवालदार वासुदेव मराठे, वसीम तडवी, एजाज गवळी, अर्षद गवळी आणि अलाउद्दीन तडवी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, गुन्हा केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या फरदीनला पोलिसांनी साकळी गावाजवळ ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, रात्री मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे.

#Jalgaon #Yawal #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #NTVNewsMarathi #JalgaonNews #YawalNews #CrimeUpdate #MarathiNews #MaharashtraCrime #LatestNews