अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवला आहे. विखे-थोरात यांच्या एकजुटीला मतदारांचा प्रतिसाद मिळाल्याचे या निकालातून दिसून आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीने हे यश मिळवले.
या निवडणुकीत संगमनेरमधून रणजीतसिंह देशमुख, नेवासा येथून शंकरराव गडाख, राहाता येथून डॉ. सुजय विखे पाटील, श्रीरामपूरमधून करण ससाणे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, शेवगावमधून राजश्री घुले पाटील, श्रीगोंद्यातून दत्तात्रय पानसरे, कोपरगावमधून बिबिन कोल्हे, नगर तालुक्यातून अक्षय कर्डिले आणि बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांची बिनविरोध निवड झाली.
प्रत्यक्ष निवडणुकीत काळे आशुतोष अशोकराव, नागवडे अनुराधाताई राजेंद्र, वाघ संगीता जयंत, पिचड वैभव मधुकर, जवळे करभारी झुंबर, सांगळे गणपतराव पुंजाजी आणि तनपुरे प्राजक्त प्रसाद यांनी विजय मिळवला.
अनेक मतदारसंघांत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आघाडीने जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या निकालात विखे-थोरात यांच्यासह शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले यांची एकत्रित भूमिका महत्त्वाची ठरल्याचे आघाडीकडून सांगण्यात आले.
या विजयाबद्दल सहकार विकास आघाडीने शेतकरी, बँकेचे सभासद, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्र सक्षम करणे, शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणे आणि ग्रामीण विकासाला गती देण्याची भूमिका आघाडीने व्यक्त केली आहे.
