दिवाळीच्या सणात प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा… याच जोरावर एरंडोल बस आगाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भाऊबीजेच्या दिवशी तब्बल १४ लाखांहून अधिक उत्पन्नाची नोंद करत आगाराने गेल्या २३ वर्षांतील विक्रम मोडला आहे.

प्रवाशांना दिलेली तत्पर सेवा, प्रशासकीय अचूक नियोजन आणि कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा या त्रिसूत्रीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एरंडोल बस आगाराने यंदाच्या भाऊबीजेला ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

११ नोव्हेंबर २०२६ रोजी भाऊबीजेनिमित्त आगाराला सवलत मूल्यासह तब्बल १४ लाख ४२ हजार ६२ रुपये इतके विक्रमी उत्पन्न मिळाले. २००३ मध्ये आगार कार्यान्वित झाल्यापासून गेल्या २३ वर्षांतील भाऊबीजेच्या दिवशी मिळालेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे.

भाऊबीजेच्या सणानिमित्त ‘लाडक्या बहिणीं’सह इतर प्रवाशांचा मोठा ओघ एरंडोल बसस्थानकावर पाहायला मिळाला. दिवसभरात मिळालेल्या १४ लाख ४२ हजार ०६२ रुपये एकूण उत्पन्नामध्ये ८ लाख ५४ हजार ७४३ रुपये निव्वळ रोख उत्पन्नाचा, तर उर्वरित रकमेचा सवलत मूल्यात समावेश आहे.

सकाळी ११ ते दुपारी २ आणि सायंकाळी ४ ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचे अचूक नियोजन करत आगाराने दिवसभरात ५९ बसगाड्यांद्वारे तब्बल २३ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तसेच सुमारे २५ हजार प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवले.

एरंडोल आगाराच्या या उल्लेखनीय आणि विक्रमी यशाबद्दल एसटी महामंडळाचे जळगाव विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी एरंडोल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे आणि संपूर्ण आगार टीमचे विशेष अभिनंदन केले.

आगाराचे हे यश म्हणजे सर्व चालक, वाहक, यांत्रिकी विभाग आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमाचे फळ आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता प्रवाशांना सुरक्षित सेवा दिल्याबद्दल सर्वच स्तरांतून आगाराचे कौतुक होत आहे.

यावेळी एरंडोल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी सांगितले की,

“एरंडोल बस आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना दर्जेदार आणि तत्पर सेवा दिली. चालक बांधवांनी अत्यंत सुरक्षित आणि जबाबदारीने वाहने चालवल्यामुळेच उत्पन्नाचे हे मोठे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवशी स्वतःच्या आनंदापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची सेवा केली. त्यामुळे या ऐतिहासिक यशाचे संपूर्ण श्रेय आगारातील प्रत्येक कर्मचाऱ्याला जाते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *