यावल ते भुसावळ राज्य महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.
यावल शहरातील पॉईंटपासून भुसावळपर्यंतच्या सुमारे १८ किलोमीटरच्या राज्य महामार्गाची अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे.
भुसावळ रेल्वे जंक्शन असल्याने या मार्गावर नोकरदार, विद्यार्थी आणि इतर वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. या मार्गावर अनेक अपघात होऊन काहींना जीवही गमवावा लागला आहे.
त्यामुळे यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.
