अंजनी धरणाचे शिल्पकार तथा एरंडोल मतदारसंघाचे माजी आमदार महेंद्रसिंग धरमसिंग पाटील यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वपक्षीय नेते आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर करत सामाजिक बांधिलकी जपली.

११ नोव्हेंबर २०२६ रोजी एरंडोल येथील रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार महेंद्रसिंग धरमसिंग पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस दिमाखात पार पडला.

१९७८ मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अवघ्या २५ व्या वर्षी विधानसभेत प्रवेश करत ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार ठरले होते.

या सोहळ्याला जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम आणि स्वागताध्यक्ष आमदार ॲड. अमोल पाटील यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, किशोर आप्पा पाटील, राजूमामा भोळे, माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार अरुण गुजराथी, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आणि जळकेकर महाराज उपस्थित होते.

यावेळी महेंद्रसिंग पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून राज्याच्या दुष्काळ निवारण निधीसाठी पाच लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी पद्मालय प्रकल्प जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच अंजनी धरण प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन वेगाने झाल्यास पुढील दोन वर्षांत प्रकल्प मार्गी लागेल, अशी ग्वाही दिली. गिरणा नदीचे तीन सिंचन आवर्तन सोडण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वागताध्यक्ष आमदार ॲड. अमोल पाटील यांनी महेंद्रसिंग पाटील यांनी सुरू केलेली विकासकामे पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी त्यांच्या भगिनींनी त्यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव केला. तर नात राजेश्वरी हिने संत तुकाराम महाराजांच्या ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीतून त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाला एरंडोलचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, पारोळ्याचे नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर आमले, बाळासाहेब चौधरी, नानाभाऊ महाजन, विजय महाजन, शालिग्राम गायकवाड, सुनील भैय्या पाटील, देविदास महाजन, महानंदा पाटील, भगवान महाजन, जगदीश ठाकूर, पिंटू राजपूत, किशोर निंबाळकर, पत्रकार संघाचे विश्वस्त विजय बापू पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद अण्णा पाटील, तालुकाध्यक्ष बी.एस. चौधरी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन स्वामी पाटील यांनी, तर आभारप्रदर्शन पुलकीता पाटील यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी पी.जी. पाटील सर, पी.सी. आबा पाटील, रविंद्र जाधव, नरेंद्रसिंग पाटील, रघुवीर पाटील, पंढरीनाथ पाटील, रमेश पाटील, अमित दादा पाटील, नगरसेवक योगेश महाजन यांच्यासह महेंद्र बापूंच्या चाहत्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *