यावल तालुक्यातील १२ गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. डॉक्टरांची उपलब्धता, रिक्त पदे आणि २४ तास आरोग्यसेवेच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, या केंद्राला वाली कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती असतानाही दोन्ही डॉक्टरांनी आठवड्यातील दिवस आपापसांत वाटून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यालयी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांची अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त असल्याचे सांगण्यात येते. मनुष्यबळाअभावी ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला असून, नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र २४×७ सेवेसाठी ओळखले जात असले, तरी प्रत्यक्षात सायंकाळनंतर सेवा उपलब्धतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत थांबतात. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवावे लागत असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे डॉक्टरांची नियमित उपलब्धता सुनिश्चित करावी, रिक्त पदे तातडीने भरावीत आणि २४ तास आरोग्यसेवेचे प्रभावी नियोजन करावे. संबंधित वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
