AKOLA | अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालयातील रिक्त पदभरतीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार रणधीर सावरकर यांना महत्त्वाची ग्वाही दिली आहे.


अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालय तसेच अतिविशेषोपचार रुग्णालयाचा आकृतीबंध मंजूर करून सर्व संवर्गातील पदभरती तातडीने करावी आणि रुग्णसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली होती. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. त्यानुसार आज, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी ही बैठक पार पडली. यावेळी रुग्णसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी तातडीने पदभरती केली जाईल, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार रणधीर सावरकर यांना दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, अकोला या प्रकल्पासाठी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अथक प्रयत्न केले होते. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून १२० कोटी रुपये, तर राज्य शासनाकडून ३० कोटी रुपये मंजूर करून घेण्यात आले होते. त्यानंतर अतिविशेषोपचार रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन ३० डिसेंबर २०२१ रोजी हे रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले. मात्र, पदभरतीअभावी हे रुग्णालय अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही.

या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार तसेच अतिविशेषोपचार रुग्णालयाचा आकृतीबंध मंजूर करणे, महाविद्यालयातील ज्युनियर रेसिडेंट आणि सिनियर रेसिडेंटची पदे भरण्यासाठी महाविद्यालयाला परवानगी देणे, तसेच गट-अ आणि गट-ब संवर्गातील पदभरती करण्याबाबत त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी आमदार सावरकर यांनी या रुग्णालयाचे महत्त्व विशद केले. अकोला, बुलढाणा, वाशिम आणि हिंगोलीसह चार ते पाच जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी अकोल्यात येतात. त्यामुळे हे रुग्णालय पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शासकीय रुग्णोपचार केंद्र बनले आहे.

या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुग्णांची नोंदणी होते, तर आंतररुग्ण विभागात सुमारे १ हजार १०० खाटा रुग्णसेवेत आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि वाढीव खाटांची संख्या लक्षात घेऊन शासनाच्या वैद्यकीय मानकांनुसार आवश्यक पदभरतीचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत सर्व बाबी बैठकीत स्पष्ट करण्यात आल्या.

या आढावा बैठकीला आमदार रणधीर सावरकर यांच्यासह राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, उपसचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोल्याचे अधिष्ठाता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


#Akola #AkolaNews #RandhirSawarkar #HasanMushrif #MedicalEducation #GovernmentHospital #SuperSpecialityHospital #MaharashtraNews #VidarbhaNews #NTVNewsMarathi #अकोला #रणधीरसावरकर #हसनमुश्रीफ #वैद्यकीयशिक्षण #रुग्णालय #महाराष्ट्रबातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *