ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आता आरोग्यसेवेसाठी वारंवार रुग्णालयांचे हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. एरंडोल तालुक्यातील १९ आयुष्यमान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून आरोग्यसेवा थेट गावागावांत पोहोचवण्याचा लोकाभिमुख उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात वारंवार जावे लागू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य उपकेंद्रांचे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिरां’मध्ये रूपांतर केले आहे. या उपक्रमांतर्गत एरंडोल तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या १९ उपकेंद्रांमध्ये आरोग्यसेवा प्रभावीपणे सुरू झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी दिली.
‘गाव तिथे आरोग्य सेवा, घराघरात आरोग्य जनजागृती’ या संकल्पनेतून एरंडोल तालुक्यात ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ हा उपक्रम राबवला जात आहे. समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांच्या समन्वयातून ग्रामीण जनतेला प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्यसेवा थेट त्यांच्या दारात उपलब्ध करून दिली जात आहे.
नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी उपकेंद्रांची कार्यवेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत आयुष्यमान आरोग्य मंदिरात नियमित बाह्यरुग्ण विभाग अर्थात ओपीडी आणि इतर सेवा दिल्या जातील. दुपारी २ ते ४ या वेळेत गावोगावी प्रत्यक्ष भेट देऊन अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा ठरवलेल्या ठिकाणी रुग्णांची तपासणी केली जाईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत गरजू, वृद्ध आणि आजारी रुग्णांच्या घरी जाऊन गृहभेटी दिल्या जातील. तर सायंकाळी ५ ते ५.३० या वेळेत दैनंदिन नोंदी आणि शासनाच्या पोर्टलवरील ऑनलाइन माहिती अद्ययावत केली जाईल.
शनिवारी नियमित ओपीडीसोबत विशेष आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार असून, ‘ई-संजीवनी टेलिमेडिसिन’च्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
प्रत्येक आयुष्यमान आरोग्य मंदिरात अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हिमोग्लोबिन, रक्तातील साखर अर्थात मधुमेह, रक्तदाब, लघवी, गर्भधारणा, मलेरिया, सिकलसेल, क्षयरोग आणि कुष्ठरोग यांसह एकूण १४ प्रकारच्या आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. याशिवाय महिलांची कर्करोगविषयक प्राथमिक तपासणी, माता व बाल आरोग्य परीक्षण, नियमित लसीकरण आणि मानसिक आरोग्य समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध आहे.
या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समुदाय आरोग्य अधिकारी दररोज किमान १० घरांना प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या आरोग्याची विचारपूस करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध नागरिक, अंथरुणाला खिळलेले रुग्ण, गरोदर व स्तनदा माता, नवजात बालके आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.
यामुळे गंभीर आजारांचे प्राथमिक स्तरावरच निदान करून तातडीने योग्य उपचार सुरू करणे शक्य होत आहे. तसेच प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात तातडीने पाठवण्याची अर्थात ‘रिफर’ करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
“आरोग्य कर्मचारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी प्रत्यक्ष रुग्णांच्या घरी जाऊन प्राथमिक तपासणी व औषधोपचार देत असल्यामुळे एरंडोल तालुक्यातील वयोवृद्ध, अंथरुणाला खिळलेले रुग्ण आणि गर्भवती महिलांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस मोफत आरोग्यसेवा देऊन एरंडोल तालुका ‘निरोगी व आरोग्यसंपन्न’ बनवण्याचे आमचे मुख्य ध्येय आहे.” – डॉ. मनोज चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, एरंडोल
