जळगाव जिल्ह्यातील यावल येथे तडवी-भिल्ल समाजाच्या एकजुटीचा नवा अध्याय पाहायला मिळाला. भगवान बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधत स्टार संस्थेच्या पहिल्या भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रथम भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. ‘एकतेतून विकासाची वाट’ हा संदेश देणाऱ्या या संमेलनाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चोपडा रोडवरील केसर बाग हॉटेल येथे सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी क्रांतिकारक तंट्या मामा भील, धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेशी नव्याने जोडल्या गेलेल्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत समाजातील एकता, शिक्षण, युवकांचा सहभाग आणि संघटनात्मक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले.
समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे, हा या संमेलनामागील प्रमुख उद्देश होता.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पार पडलेल्या या स्नेहसंमेलनातून तडवी-भिल्ल समाजाच्या एकजुटीचा आणि उज्ज्वल भवितव्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्टार संस्थेचे हे पहिले भव्य स्नेहसंमेलन समाजाच्या संघटनात्मक वाटचालीतील महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
