वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे शेतात साठवून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला रात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत अंदाजे दीडशे क्विंटल मका जळून खाक झाला असून, शेतकरी शेख फकीर मोहम्मद यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
खंडाळा येथील गट क्रमांक २४३ मधील शेतात रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शेतकरी शेख फकीर मोहम्मद यांनी काढणी केलेला मका गंजीच्या स्वरूपात शेतात साठवून ठेवला होता. या गंजीला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लगतच्या शेतात पाणी भरत असलेले शेतकरी युनूस सय्यद यांच्या निदर्शनास मक्याच्या गंजीला आग लागल्याचे आले. त्यांनी तत्काळ शेख फकीर मोहम्मद यांना फोन करून माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत अंदाजे दीडशे क्विंटल मका जळून खाक झाला.
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे मोठे संकट कोसळले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास होणे गरजेचे आहे.
शासनाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि बाधित शेतकरी शेख फकीर मोहम्मद यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
