संतविचारांचा जागर, वारकरी परंपरेचा भक्तिमय सोहळा आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव… अशा वातावरणात जळगाव जिल्ह्यातील आडगाव येथे ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ उत्साहात पार पडले. यावेळी अकरा मान्यवरांचा सन्मान आणि ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.

वैचारिक स्वराज्य संस्थेच्या वतीने आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारताचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे होते. तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वैचारिक स्वराज्य वेध वार्षिकांक २०२६-२७’ चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांची विशेष उपस्थिती होती. गुलाबरावजी वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील आणि ॲड. विश्वासराव भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ह.भ.प. भानुदास महाराज आडगावकर, दिलीप खोडपे सर, लीलाताई चौधरी, भागवत पाटील, भैय्यासाहेब पाटील, प्रा. सुनील पाटील, विनायक पाटील, जिल्हा परिषद शाळा होळ, संजय हिरे आणि अमृत देशमुख यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

यावेळी लीलाताई चौधरी यांनी महिलांनी आत्मविश्वासाने कर्तृत्व सिद्ध करण्याचे आवाहन केले. प्राचार्य सुनील पाटील यांनी वैचारिक स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. अरुणभाई गुजराथी यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या चळवळींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुभाष भामरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ठाकरे यांनी केले, तर आभार ॲड. विश्वासराव भोसले यांनी मानले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *