बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आलेगावमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी त्रस्त झालेल्या शेकडो महिलांनी थेट अकोला जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, या घटनेवरून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे यांनी उद्धवसेनेला लक्ष्य करत राजकीय टोला लगावला आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पातूर तालुक्यातील आलेगाव येथे भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यातच गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी अकोला जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला.
आलेगाव हे गाव बाळापूर विधानसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार करतात. मात्र गावात पाण्याची भीषण टंचाई असतानाही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
गावातील हातपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नळ योजनेचे पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने मिळत नसल्याने महिलांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचा परिणाम शाळकरी मुलांचे शिक्षण, शेतमजुरांचे काम आणि गुरांच्या पाण्याच्या व्यवस्थेवरही होत आहे.
या परिस्थितीला कंटाळून शेकडो महिला हातात रिकाम्या घागरी आणि हंडे घेऊन अकोला जिल्हा परिषद कार्यालयावर धडकल्या. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही महिलांनी दिला. या मोर्चामुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गणेश तायडेंचा उद्धवसेनेला टोला
दरम्यान, या घटनेवर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे यांनी प्रतिक्रिया देताना उद्धवसेनेला लक्ष्य केले. अकोला पूर्व मतदारसंघाला जिल्ह्यात विकास पर्व म्हणून ओळख मिळत असताना उबाठाचे समर्थक तेथील आमदारांवर टीका करत आहेत. मात्र त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात लक्ष घालण्याआधी आपल्या आमदारांना बाळापूर मतदारसंघातील पाणी संकट सोडवण्यास सांगावे, असा टोला तायडे यांनी लगावला.
गणेश तायडे म्हणाले, “दुसऱ्या मतदारसंघात लक्ष घालण्याआधी आपल्या मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडवा. आलेगावमध्ये नोव्हेंबर महिन्यातच पिण्यासाठी पाणी नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ज्या मतदारसंघातील महिलांना पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढावा लागतो, त्या मतदारसंघाचे आमदार आणि त्यांचे समर्थक दुसऱ्यांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार ठेवत नाहीत.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, अकोला पूर्व मतदारसंघात आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक क्षेत्र, रस्ते, पाणीपुरवठा आणि विमानतळ विकासासह अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे अकोला पूर्व मतदारसंघाची ओळख विकास पर्व म्हणून झाली आहे. मात्र उबाठाच्या लोकांना हा विकास पचत नसल्याने ते बिनबुडाची टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. टीका करण्याऐवजी बाळापूर मतदारसंघातील आलेगाव आणि पातूरसारख्या गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
पाणी प्रश्नावर प्रशासनाकडे मागणी
आलेगावच्या महिलांच्या घागर मोर्चामुळे बाळापूर मतदारसंघातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, नळ योजनेची दुरुस्ती करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने महिलांच्या निवेदनाची दखल घेत लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र प्रत्यक्षात गावात पाणी कधी पोहोचणार, याकडे संपूर्ण आलेगावचे लक्ष लागले आहे.
