AKOLA | आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या विकासकामांवरून सुरू असलेल्या राजकीय टीकेला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. टीका करणं सोपं, मात्र प्रत्यक्ष विकासकामं करून दाखवणं कठीण असल्याचं सांगत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे यांनी विरोधकांना बाळापूरमधील विकासकामांचा लेखाजोखा मांडण्याचे आव्हान दिले आहे.
टीका करणं हे जगातलं सर्वात सोपं काम आहे. कोणावरही टीका करण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत, अभ्यास करावा लागत नाही किंवा लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागत नाहीत. मात्र विकास करणं, लोकांच्या समस्या सोडवणं आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणणं हे कठीण काम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर हेच काम करत असल्याने जनतेने त्यांना प्रेमाने ‘विकास महर्षी’ ही ओळख दिल्याचे गणेश तायडे यांनी म्हटले आहे.
अकोला पूर्वच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आमदार रणधीरभाऊ यांनी मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज आणि शेतरस्त्यांसारखी मूलभूत विकासकामे केली आहेत. शेतकऱ्यांना भेडसावणारा वन्यप्राण्यांचा प्रश्न, पीकविम्याचा प्रश्न तसेच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याचा मुद्दा त्यांनी विधिमंडळात उपस्थित केला आहे. सत्ताधारी आमदार असूनही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याचे तायडे यांनी सांगितले.
आमदार रणधीरभाऊ यांच्या कार्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याप्रमाणे जनता दरबार भरवला जातो. या जनता दरबारात अकोला जिल्ह्यातील नागरिक आपल्या समस्या आणि तक्रारी घेऊन येतात. प्रत्येक नागरिकाची समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. एखादे काम होण्यासारखे असेल, तर ते त्याच दिवशी मार्गी लावण्याची आमदार रणधीरभाऊ यांची कार्यपद्धती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सडेतोड बोलणे हा आमदार रणधीरभाऊ यांचा स्वभाव आहे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि काम करण्याची पद्धत मतदारांना पसंत असल्यानेच ते तीन वेळा विधानसभा निवडणुकीत वाढत्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. लोक मतदान करतात, कारण त्यांना प्रत्यक्ष काम दिसते, असे गणेश तायडे यांनी म्हटले आहे.
सध्या उबाठाच्या नेत्यांकडून आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्यावर टीका केली जात आहे. यावर प्रत्युत्तर देताना, तुम्ही टीका करता ते काम सोपे आहे; मात्र रणधीरभाऊ सावरकर होणं खूप कठीण आहे, असा टोला गणेश तायडे यांनी लगावला आहे. अकोला पूर्व मतदारसंघात झालेल्या विकासाच्या तुलनेत बाळापूर मतदारसंघात किमान २० टक्के विकास तरी झाला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बाळापूरमधील जनता जिल्हा आणि तालुक्याला जोडणारे रस्ते व्यवस्थित नसल्याने त्रस्त असल्याचे सांगत शेगाव दिंडी मार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या कामाला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारत आधी आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवावेत आणि नंतर इतरांवर टीका करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दुसऱ्याच्या विकासावर टीका करण्यापूर्वी आपल्या मतदारसंघातील पाणी, रस्ते आणि वीज या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे. कारण जनता आता सुजाण झाली असून, तिला केवळ टीका करणारा नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारा नेता हवा आहे. अकोला पूर्वच्या जनतेने तीन वेळा निवडणुकीत विजय मिळवून आपला विश्वास रणधीरभाऊ सावरकर यांच्यावर असल्याचे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे यांनी दिली.
#Akola #AkolaEast #RandhirSawarkar #GaneshTayde #BJP #Balapur #MaharashtraPolitics #Development #PoliticalNews #AkolaNews #NTVNewsMarathi #अकोला #रणधीरसावरकर #विकासमहर्षी #भाजपा #महाराष्ट्रराजकारण #एनटीव्हीन्यूजमराठी
