AKOLA | भाजपा आमदार रणधीर सावरकर यांच्यावर विकासकामांवरून टीका करणाऱ्या सरिता वाकोडे यांना भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या गावात झालेल्या विकासकामांचा लाभ घेतल्यानंतर टीका कशाच्या आधारावर करता, असा सवाल उपस्थित करत भाजपाने आमदार नितीन देशमुख यांच्या विकासकामांचाही हिशेब मागितला आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मतदारसंघातील विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून निवडणूक लढवली होती. मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न, विविध विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेच्या आधारावर त्यांनी जनतेचा कौल मागितला होता.
विशेष म्हणजे, सरिता वाकोडे ज्या गावात राहतात, त्याच गावात आमदार रणधीर सावरकर यांनी तब्बल दहा कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा भाजपाने केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावात एक तरी ठोस विकासकाम झाले असेल, तर ते जनतेसमोर दाखवावे, असे खुले आव्हानही भाजपाने दिले आहे.
विकासकामांचा लाभ स्वतःच्या शेतालाही!
गोरेगाव खुर्द ते कापशी परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या रस्त्यांमुळे सौ. सरिता वाकोडे यांच्या शेताला थेट रस्त्याची म्हणजेच रोड-टच सुविधा उपलब्ध झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. या रस्त्यांमुळे शेतजमिनीच्या दळणवळणात सोय झाली असून, जमिनीच्या मूल्यामध्ये लक्षणीय वाढ होऊन कोट्यवधी रुपयांचा फायदा झाल्याचेही भाजपाचे म्हणणे आहे.
ज्या विकासकामांचा लाभ स्वतःच्या शेतालाही झाला, त्याच कामांवर टीका करताना वस्तुस्थितीचा विचार करावा, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात गोरेगाव खुर्द येथील रस्त्याचे काम कोणत्या कारणामुळे रखडले आणि त्यासाठी नेमके कोण जबाबदार होते, याचाही खुलासा सरिता वाकोडे यांनी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरिता वाकोडे यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. किती कामे मंजूर झाली, किती पूर्ण झाली आणि किती अपूर्ण राहिली, याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, असे भाजपाने म्हटले आहे.
भाजपाचा स्पष्ट सवाल!
आमदार रणधीर सावरकर यांच्या विकासकामांवर टीका करणाऱ्या सरिता वाकोडे आमदार नितीन देशमुख यांच्या सात वर्षांच्या विकासाचा लेखाजोखा मांडणार का? मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा लाभ आपल्या शेताला झाल्याची वस्तुस्थिती मान्य करणार का? तसेच महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात आपल्या गावात झालेले एक तरी विकासकाम जनतेसमोर दाखवणार का? की टीका फक्त भाजपाच्या लोकप्रतिनिधींवरच करायची आणि स्वतःच्या नेत्यांच्या कामाबाबत मौन बाळगायचे, असा सवाल भाजपाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
अशी प्रतिक्रिया सौ. मुक्ता राजेश टाले, मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चा, अकोला दक्षिण यांनी दिली आहे.
#Akola #AkolaPolitics #RandhirSawarkar #SaritaWakode #NitinDeshmukh #BJP #MaharashtraPolitics #DevelopmentWork #Balapur #GoregaonKhurd #MaharashtraNews #PoliticalNews #NTVNewsMarathi #अकोला #राजकारण #विकासकामे #भाजपा #एनटीव्हीन्यूजमराठी
