अजित पवार यांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तीन महत्त्वाचे सवाल उपस्थित करत त्यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांच्या निधनाचे राजकारण होऊ नये, ही आमची भूमिका होती. अजितदादा आमचे नेते होते आणि त्यांच्याबद्दल आम्हाला मनापासून आदर आहे. मात्र, या संवेदनशील प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न झाल्यास उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी विखे पाटील यांनी रोहित पवारांना तीन सवाल केले. अजित पवार यांच्या अपघाताबाबत किंवा घातपाताच्या संशयाबाबत त्यांच्या कुटुंबीयांनीच प्रश्न उपस्थित केलेले नसताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याचे कारण काय? असा पहिला सवाल त्यांनी केला.

दुसऱ्या सवालात त्यांनी तपास यंत्रणांबाबत भूमिका बदलल्याचा मुद्दा उपस्थित केला. सहा महिन्यांपूर्वी ईडीच्या कारवाईवेळी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांवर अविश्वास व्यक्त केला जात होता. मग आता सीआयडीऐवजी सीबीआय तपासाची मागणी का? सीबीआयवर अचानक विश्वास कसा निर्माण झाला? असा प्रश्न त्यांनी विचारला.

तिसऱ्या सवालात त्यांनी व्हीएसआर कंपनीचा मुद्दा उपस्थित केला. कंपनीच्या मालकासोबत मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र दाखवून संबंध सूचित केले जात असतील, तर रोहित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र दाखवून त्यांच्याबाबतही असेच प्रश्न उपस्थित करता येतील का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तसेच अदानी यांच्याबाबत राहुल गांधी सातत्याने आरोप करत असताना, त्यांची गाडी चालवतानाचे रोहित पवारांचे छायाचित्र दाखवून प्रश्न उपस्थित करता येतील, असेही ते म्हणाले.

अपघाताच्या तपासाबाबत कोणतीही शंका असल्यास निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. आवश्यक पुरावे, व्हिडिओ आणि संबंधित माहिती समोर आली पाहिजे. मात्र, चौकशीच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांना विनाकारण लक्ष्य करणे योग्य नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

अपघाताशी संबंधित पुरावे किंवा शंका असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागणे आणि त्यानंतर न्यायालयात जाणे, असे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. केवळ माध्यमांसमोर आरोप करून निष्कर्ष लादता येणार नाहीत. माध्यमे ही माहिती पोहोचविण्याचे माध्यम आहेत, न्यायाधीश नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झाल्यास पक्ष म्हणून आणि वैयक्तिक पातळीवरही ठाम भूमिका मांडणार असल्याचा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *